रूपं

सकाळी उठून तो घराच्या अंगणातल्या बागेत फिरत होता. गुलाबाच्या झाडांना काही गुलाब येताना दिसत होते. काही कळ्या, काही उमलत्या कळ्या आणि एक गुलाब आजच पूर्ण उमलला होता. त्याने गुलाबाच्या अगदी जवळ जाऊन त्याला निरखून पाहिलं. टपोरा, केशरी, सुगंधी गुलाब. सकाळचं दव त्याच्या अंगावर पडून त्याची खूबसुरती आणखीन खुलवतेय ह्याबद्दल अनभिज्ञ गुलाब. आपण किती सुंदर आहोत हे जेव्हा त्या सौंदर्य लेण्याऱ्याला माहित नसतं तेव्हा त्याच्या सौंदर्याला चार चांद लागतात. त्याने गुलाबाकडे पाहत डोळे मिटले.

डोळे उघडले तेव्हा तो बरीच वर्षं भूतकाळात लोटला गेला होता. MBA कॉलेजमधला दिवस पहिला. सगळ्यांची introduction होऊन सर बोलायला सुरुवात करणार एवढ्यात दार उघडून एक आवाज आला.

“Sir, may I come in?”

“It’s the first day of the course and you are late!!!”

सरांचं पुढे काहीतरी बोलणं चालू राहिलं पण त्याला काहीच ऐकू आलं नाही. अर्जुनासारखं त्याचं लक्ष फक्त पोपटाच्या डोळ्याकडे केंद्रित होतं.

त्याचा पोपटाचा डोळा दारात “उभी” होती. ती. केशरी लखनवी स्लीव्हलेस कुर्ता, खाली पांढराशुभ्र चुडीदार, खांद्यावर बॅग, केस मोकळे, ओले. तिने नुकतीच आंघोळ केली असावी आणि घाईत केसांवर टॉवेल झटकून बाहेर पडली असावी. खांद्यावरून खाली दंडावर रूळणारे, चेहऱ्यावर येऊन तिच्या बोलण्यात व्यत्यय आणणारे तिचे ओले केस. ती त्यांना हाताने मागे सारत होती. टपोरे डोळे, धारदार नाक, नाजूक ओठ आणि त्यांना सांभाळून घेणारी हनुवटी. फुरसत में बनाया हैं इसको कॅटेगरीत बसणारी मुलगी. दंडावर केसांतून ओघळणाऱ्या पाण्याचे थेंब. दवबिंदूत सनबाथ घेणारा टपोरा केशरी गुलाब. “आपल्या डोक्यात काय काय येतंय?” तो भानावर आला.

“You stay in the college hostel which is just 5 minutes walking distance from here and still you’re late. This guy, what’s your name?”

सरांनी त्याच्याकडे बोट दाखवून विचारलं.

“Kedar, sir”

“Kedar travelled for 2 hours to come to the college and he was here before the class started.”

तिने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा अंमळ रागच दिसला त्याला तिच्या नजरेत. एकदाचं सरांनी तिचं बौद्धिक घेणं थांबवलं आणि तिला आत यायला परवानगी दिली.

“मुलगी इतकी सुंदर आहे म्हणून सरांनी क्लास अटेंड करायला परवानगी दिली. तिच्या जागी आपण असतो तर ह्याच्या तिप्पट अपमान करून क्लासबाहेर हाकललं असतं.” बाजूला बसलेला मुलगा ह्याच्या कानात कुजबुजला तसं त्याच्या ध्यानात आलं की तिची दखल घेणारा तो एकमेव नव्हता. नसणारंच होता. गुलाब गुलाब आहे हे सगळ्यांना माहित असतं. त्याने उसासा टाकला.

त्यानंतर त्याची नजर तिला शोधत राहायची. ती त्याच्या अंदाजाप्रमाणेच निघाली. गोड, नाजूक, क्लासमध्ये मन लावून लेक्चर ऐकणारी, हसरी. “किती कमी खाते यार ही” मेसमध्ये तिचं ताट पाहून त्याला वाटायचं. लिमिटेड थाळीतही तिची निम्मी चिकन करी तिच्या मैत्रिणी फस्त करायच्या. तीनचार महिने झाले आणि त्याने तिला “मला तू आवडतेस” सांगायचं ठरवलं. वर्गात त्यांची फार बोलचाल नव्हती. ती कधी एकटीही सापडायची नाही. तिच्या मैत्रिणी सतत सोबत. मिडटर्म परीक्षा तोंडावर आल्या होत्या आणि अभ्यास करायला म्हणून ती कॉलेजपासून थोडया दूर एका लायब्ररीत रोज संध्याकाळी जाऊन बसते ही बातमी त्याला मिळाली. झालं. आता हा मौका साधून तिच्याशी बोलायचं त्याने ठरवलं. आपलं लकी शर्ट (तो त्याला लकी वाटायचा) घालून, ठेवणीतला परफ्युम मारून तो तिच्यापाठी निघाला. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, त्याची हिंमतच होत नव्हती तिच्याशी बोलायची.

चौथ्या दिवशी तोच शर्ट घालून जायची हिंमत झाली नाही कारण घामाचा वास कुठलाही परफ्युम लपवू शकत नव्हता. त्याने दुसरा टीशर्ट घातला आणि पुन्हा तिच्या लायब्ररीच्या वाटेवर तिच्या मागे चालत राहिला. ती वीस फुटांवर असेल. तिच्या समोरून एक माणूस चालत येत होता. तिच्याकडे पाहत तिच्या बाजूने पास होताना त्याने त्याच्या हाताचं कोपर बाहेर काढून तिच्या छातीला स्पर्श केला आणि पुढे तरातरा चालत राहिला. केदारच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो माणूस त्याच्याच दिशेने येत होता. तो केदारच्या अगदी जवळ आला आणि केदार त्याला पकडणार एवढ्यात ती धावत तिथे पोहोचली. त्या माणसाच्या पाठीवर हात मारून तिने त्याला वळवलं.

“कोपरा मारायचा खूप शौक आहे ना? मग मी पूर्ण करते तुझा शौक”

म्हणत तिने तिच्या हाताचा कोपरा जोरात त्याच्या पोटात मारला. हे असं काही होईल ह्याची अजिबात कल्पना नसल्याने तो आणखीन जोरात बसला. Shocked होऊन तो कळवळला. आजूबाजूचे लोकही थांबून बघायला लागले. त्यामुळे पुढे काही झालं तर आपल्याला मार पडेल हे उमजून सॉरी म्हणत त्याने धूम ठोकली.

त्याच्यापेक्षा केदार जास्त shocked होता. ती त्याच्या अंदाजापेक्षा अगदी वेगळी निघाली होती.

“केदार!!!”

तो भानावर आला.

“चार दिवस झाले तू माझ्या पाठी येतोयेस. काय चालू आहे?”

ती ऑलमोस्ट ओरडलीच.

“शिट!!!”

त्याने जीभ चावली.

“सांगतो. पण प्लीज मला कोपरा मारू नकोस. तुझ्या रूपावर तर मी पहिल्याच दिवशी भाळलो होतो पण आजचं तुझं हे रुप पाहून मी तुझ्या प्रेमात पडलोय.

“रूपावर भाळलो होतो??? कोण बोलतं रे असं???”

“Sorry. I could have done better. But I am so nervous.”

“अच्छा. म्हणजे मराठीत बोलता येत नाही म्हणून इंग्लिशमध्ये इंप्रेस करतोयस.”

“अगं नाही. ते…”

मध्ये थांबून तो म्हणाला.

“तुला मी मला काय वाटतं ते सांगितलं पण तुला राग नाही आला. ह्याचा अर्थ???”

“काय???”

“तुलाही मी???”

“काय?”

“आवडतो???”

“असा कसा अर्थ काढलास???”

“तू खेचतेस ना माझी???”

“नाही. तू म्हणालास की तुझं माझ्यावर प्रेम आहे. त्यात राग येण्यासारखं काही नाही. छान वाटलं ऐकून. पण मला तसं काही वाटत नाही तुझ्याबद्दल.”

तो गप्प बसला. हिरमुसला.

“चिल यार. इथे पुढे बन मस्का आणि चहा छान मिळतो. जाऊया???”

दिल तुटलं की पोरं त्यांच्या बेस्ट फ्रेंडकडे जाऊन मन मोकळं करतात, काही दारू पितात. इथे जिने त्याचं दिल तोडलं होतं तीच त्याला बनमस्का, चहाला घेऊन जात होती. तिचं आणखीन एक रुप. तो हसला.

त्यादिवशी दोघांची मैत्री झाली. वर्षभरात दोघे घट्ट मित्र झाले. कॉलेज संपता संपता ती त्याच्या प्रेमात पडली. प्रपोज वगैरे करायची गरजही पडली नाही. यथावकाश दोघांचं लग्न झालं. दोन मुलंही झाली. त्या गोष्टीला दहा वर्षं झाली. ह्या काळात त्याने तिची अनेक रूपं पाहिली. त्याची क्रश, त्याचं दिल तोडून त्याला बनमस्का खिलवणारी मुलगी, मैत्रीण, एक मनस्वी मुलगी, त्याची प्रेयसी, करियरफोकस्ड मुलगी, त्याची बायको, त्याच्या आईची सून, त्याच्या मुलांची आई. तिचं प्रत्येक रूप त्याचे अंदाज थोडं चुकवायचं, पण ते चुकणं त्याला आवडून जायचं.

“गुलाब पाहून पोट भरलंय की नाश्त्याला येणार आहेस?”

मागून तिचा आवाज आला आणि तो झाडावरच्या केशरी गुलाबाला सोडून त्याच्या गुलाबाकडे वळला.

Leave a comment