पुरेसं

गार्गी घरात उड्या मारत पळत होती. स्वतःच्या नादात, काहीतरी पुटपुटत आणि चेहऱ्यावर विलक्षण खुशीचे भाव.

मिहीर ब्रेकफास्ट करत तिच्याकडे बघत होता. तिच्या चेहऱ्यावरची खुशी मिहिरच्या चेहऱ्यावर परावर्तीत होत, त्याने नेहाला विचारलं.

“हिला काय झालंय? एवढी खूश का आज?”

“मी सकाळी सुपरमार्केटहून आणलेल्या सामानात तिने आईस्क्रीमचा डबा पाहिलाय.” नेहा हसत म्हणाली.

“तिचा घसा खराब आहे, अजून एक आठवडा तरी आईस्क्रीम कुठे खाऊ शकणार आहे ती?”

“अरे खाऊ शकणार नसली तरी फ्रिजमध्ये आईस्क्रीम आहे एवढं कारण पुरेसं आहे तिला खूश व्हायला.”

गार्गीकडे आणखीन कौतुकाने, प्रेमाने पाहत मिहीर भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहत म्हणाला.

“Listen, I goto rush. आज दिवसभर मीटिंग्ज आहेत. आणि आज संध्याकाळी…”

“तुमचं इंजिनियरिंग कॉलेजचं गेट टुगेदर आहे. माहित आहे. किती वेळा सांगशील? किती ती excitement.”

स्वतःशीच हसत मिहीर नेहाला बाय म्हणत, गार्गीला पप्पी देऊन दार उघडून पळाला.

संध्याकाळी मिहीरच्या इंजिनियरिंगच्या कॉलेजचं गेटटुगेदर होतं. तब्बल 15 वर्षांनंतर सगळे भेटणार होते. इंजिनियरिंगनंतर त्यांचा क्लास वेगवेगळ्या दिशेला विखुरला होता. कोरोनाकाळात घरी असल्यामुळे आणि नात्यांची वेगळ्याने जाणीव होऊन कोणीतरी पुढाकार घेऊन व्हॉट्सअप ग्रुप बनवला. त्यावर चॅट्स, व्हॉइस नोट्स, व्हिडीओज शेयर होऊ लागले. अखेर दोन वर्षांनंतर एक गेटटुगेदर करायचं ठरलं. ते आज होणार होतं. इतर वेळी कामात घड्याळ पाहायचं विसरणारा मिहीर आज सतत वेळेकडे लक्ष देऊन होता. संध्याकाळी बरोबर पाच वाजता मिहीरची ओला कॅब रिसॉर्टच्या वाटेवर धावू लागली.

रिसॉर्टवर “Summer of 2007” चा बॅनर लागला होता. जवळपास साठेक जण जमले होते. बॅकग्राऊंडला 90 च्या दशकातली हिंदी फिल्म्सची गाणी आणि फोरग्राउंडला गप्पा हास्यकल्लोळ आणि खाऊ पिऊ.

“Oh my God, I didnt recognise you.”
“You look just the same.”
“Where is…?”
“Are you in touch with…?”
“Did you hear about…?”
पडलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं. तासाभरात साठ जणांचा मोठा ग्रुप छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये पांगला.

मिहीरने एका ग्रुपमधून excuse me म्हणत एक ब्रेक घेतला. काऊंटरवरून एक बियर घेऊन, रिसॉर्टच्या स्मोकिंग झोनमध्ये येत त्याने सिगारेट शिलगावली. मोठया ग्रुपमध्ये असताना त्याची नजर तिला शोधत होती. त्याची नजर तिच्याकडे गेली तसं तिनेही त्याच्याकडे पाहिलं आणि दोघे एकमेकांकडे पाहून हसले. नंतर इतरांशी गप्पा मारण्यात दोघेही बिझी झाले आणि मिहीरला अजूनही तिच्याशी बोलायला मिळालं नव्हतं.

अवंतिका. मिहीरच्या बेस्ट फ्रेंड रोहितची गर्लफ्रेंड. तेवढीच ओळख तिची आणि त्याची. रोहित, मिहीर कॉलेजच्या कट्ट्यावर सिगरेट फुकत बसले की कधी ती तिथे येणार, तिला पाहून रोहित सिगरेट फेकणार आणि मिहीर, अवंतिका दोघे रोहितची खेचणार. मग रोहित मिहीरला टाटा करून अवंतिकाबरोबर निघून जाणार. हीच गत कॉलेजच्या कँटीनमध्ये, बास्केटबॉल ग्राऊंडवर. मिहीर आणि अवंतिका ह्यांची बोलचाल एवढीच. ती कंप्युटर सायन्सला होती आणि रोहित, मिहीर दोघे मेकॅनिकलला. रोहित आणि अवंतिकाचा फर्स्ट इयरचा मेकॅनिक्स विषय अजूनही अडकला होता. तिघे थर्ड इयरला आले, बाकीच्या सेमिस्टरमध्ये फर्स्ट क्लासही मिळत होता पण साला मेकॅनिक्स सुटायचं नाव घेत नव्हता. “मी सोडवतो तुझा पेपर” म्हणून मिहीरने रोहितचा मेकॅनिक्स सोडवायची शपथ घेतली. “हिचा पण सोडव प्लीज यार” म्हणत रोहित अवंतिकाला घेऊन आला. आणि थर्ड इयरपासून अवंतिका-रोहित-मिहीर हे तिघे सगळीकडे एकत्र फिरू लागले. कँटीन, कट्टा, बास्केटबॉल ग्राऊंड, सगळीकडे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मिहीर दोघांना शिकवत असे. शेवटी मिहीरकृपेने दोघांचा मेकॅनिक्स सुटला मात्र मिहीर अवंतिकाच्या प्रेमात अडकला. आणि ही KT इतकी विचित्र होती की ना त्याला सोडवता येत होती ना तो कोणाला तिच्याबद्दल सांगू शकत होता. आवडणारी मुलगी पटत नसेल/तिच्याशी बोलायचा धीर होत नसेल, काहीही प्रॉब्लेम असला तरी बेस्ट फ्रेंडकडे सांगून मोकळं होता येतं. इथे मिहीरला तेही शक्य नव्हतं. To fall in love with the girlfriend of your best friend was way out of line. त्याची अवस्था फ्रेंड्स सिरीजमधल्या hopelessly रॅचेलच्या प्रेमात पडणाऱ्या जोईसारखी झाली होती. पण निदान तेव्हा रॉस-रॅचेल एकमेकांना डेट करत नव्हते. तरीही ती सगळ्यांसाठी uncomfortable गोष्ट होती. इथे तर रोहित-अवंतिका एकमेकांसोबत होते. मिहीरची अवस्था खूप वाईट होती. शेवटी “आता तुमची KT निघालीय. तेव्हा आता तुम्ही लव्हबर्ड्स पुन्हा मजा करा. हड्डी इज लिव्हिंग कबाब” असं मस्करीत म्हणत मिहीरने दोघांसोबत जाणं टाळायला सुरुवात केली. त्यांनाही जास्त फरक पडला नाही. Afterall they were lovebirds, they were in a different world altogether. मिहीर वरवर ठीक वाटत असला तरी आतून तुटत होता. जितका स्वतःला अवंतिकापासून दूर करायचा प्रयत्न करत होता मनाने तितकाच तिच्या जवळ जात होता. आणि लास्ट इयरमधला तो दिवस उगवला.

एका कॉलेजच्या बास्केटबॉल टूर्नामेंटमध्ये भाग घेण्यासाठी तीन इंजिनियरिंगच्या कॉलेजेस मधून मुलांच्या बास्केटबॉलची एक टीम तयार करण्यात आली. ह्यांच्या कॉलेजमधून रोहित, मिहीर दोघेही होते. अवंतिका रोहितला सपोर्ट करायला येणार होती. ऐन टूर्नामेंटच्या दिवशी रोहितला फूड पोईझनिंग झालं. त्याच्या जागी दुसऱ्या कॉलेजमधला राखीव खेळाडू घेतला गेला. “आपल्या कॉलेजचं रेप्रेझेंटेशन आहे, मी येते तुला चियर करायला” म्हणत अवंतिका मिहीरसोबत गेली. तो आख्खा दिवस दोघांनी एकत्र घालवला. आधी ट्रेनमधून प्रवास, मग बास्केटबॉल ग्राऊंडमधल्या मिहीरला तिचं प्रेक्षकांतून चियर करणं, दोन मॅचेसमध्ये मारलेल्या गप्पा, मॅच संपल्यावर दोघांनी एका चायनीज रेस्टोरंटमध्ये केलेलं जेवण, तिला काही पुस्तकं हवी होती, त्यासाठी नंतर पुस्तकगल्लीत मारलेल्या चकरा, तिची अथक बडबड, तिच्यासोबतचे ते दहा तास.

“ए काश के हम होश में अब आने ना पाए
बस नगमे तेरे प्यार के गाते ही जाए”

रिसॉर्टवर लागलेल्या गाण्यांमध्ये अचानक हे गाणं लागलं आणि मिहीर भानावर आला. What a coincidence! त्या दिवशी अगदी हेच…हेच गाणं अवंतिकासोबत असताना त्याच्या मनाच्या बॅकग्राऊंडवर लागलं होतं. त्या एका दिवसापुरता ती कभी हां कभी ना पिक्चरमधली ऍना होती आणि तो सुनील. ती बडबड करत होती पण त्याला मात्र ते गाणं ऐकू येत होतं.
“हो बस अगर तुम हमारे सनम
हम तो सितारों पे रख दें कदम
सारा जहाँ भूल जाएँ
बस नगमें तेरे प्यार के गाते ही जाएं”

साला काय जिव्हारी लागणाऱ्या ओळी आहेत. फक्त माझीच असतीस तू तर???
तो दिवस संपला पण हा प्रश्न मिहीरच्या मनातून संपला नाही. पण तो काय करु शकणार होता. लास्ट इयर असंच संपलं आणि कदाचित ह्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मिहीर MS चं कारण काढून अमेरिकेत निघून गेला. सहा महिन्यांनी रोहित अवंतिकाचा ब्रेक अप झाल्याचं कळलं. रोहितशी टच मध्ये होता, पण फक्त मेल्सवर. रोहित MBA एंट्रन्सची तयारी करत होता. आपण अवंतिकाशी बोलूयात का? हा विचार कैक वेळा मनात आला पण त्यावर त्यानेच स्वतःला “नको” म्हणून बजावलं.

त्यानंतर आज दिसली अवंतिका. रोहित लंडनला होता. ऑनलाईन येऊन त्याने सगळ्यांना हाय म्हटलं. अवंतिका. थोडी गुटगुटीत झाली होती पण 15 वर्षांपूर्वी जशी दिसायची अगदी तशीच सुंदर होती. मिहीरच्या मनात आठवणींनी ढवळून आलं.

“मिहीsssर”
अवंतिकाचा मागून आवाज आला तशी त्याने चपापून सिगरेट खाली टाकली.

“तू कधीपासून रोहितसारखा मला घाबरायला लागलास?”
अवंतिका म्हणाली तसे दोघेही हसायला लागले. मग एकमेकांबद्दल चौकशी सुरु झाली. मिहीरने नेहा आणि गार्गीबद्दल सांगितलं. अवंतिकाने तिच्या नवऱ्याबद्दल, दोन मुलांबद्दल, करियरबद्दल सांगितलं. दोन मिनिटं शांतता होती. बियरचा एक घोट घेत, घसा खाकरत मिहीर म्हणाला.

“I have a confession to make. Back in college, I had a little crush on you.” डोळे मिचकावत, स्माईल करत त्याने तिच्याकडे पाहिलं.

तिने तिच्या हातातल्या बियरचा घोट घेत, शांतपणे त्याच्याकडे पाहत, गंभीरपणे विचारलं.
“A little crush or you were madly in love with me?”

मिहीर उडालाच. तो पुढे काही विचारणार एवढ्यात अवंतिका म्हणाली.

“Yes, I knew. Your eyes, your body language, everything gave it away. आपण तिघे एकत्र असताना तू गप्प असायचास पण तुझे डोळे बोलायचे. पुस्तकात काही दाखवताना चुकून तुझ्या हाताचा माझ्या हाताला स्पर्श झाला तरी ठिणग्या उडायच्या तुझ्या अंतरंगात. त्या हाताला तिथेच राहू द्यायची इच्छा आणि तसं करणं चूक आहे ह्यातला संघर्ष तुझ्या मनात चालू असताना तो ताण दिसायचा तुझ्या चेहऱ्यावर. रोहितने अभ्यास करता करता माझ्या गळ्याभोवती घातलेला हात, तुझा गळा आवळेइतपत सफोकेट करायचा तुला मग तुझं “चहा सांगतो, अमुक मित्राला फोन करतो” सांगून तिकडून कल्टी मारणं, सगळं समजायचं रे.”

ती बोलता बोलता थांबली.

“रोहितला…?” त्याने पुढे म्हणायच्या आधीच त्याला तोडत ती म्हणाली.

“नाही… त्याला नव्हतं कळलं”

बियरचा आणखीन एक घोट घेत ती पुढे म्हणाली.

“तसंही तुम्हा मुलांना कुठे काय कळतं?”

दोन सेकंद शांतता आणि मिहीरने चमकून तिच्याकडे पाहिलं.

तिने भुवया उंचावल्या आणि एक क्षीण स्माईल केलं.

“कधी? कसं?” मिहीर एवढंच बोलू शकला.

“तेव्हाच जेव्हा तू…I too fell hopelessly in love with you. The reason why you chose to keep your feelings a secret made me hide my feelings as well. टूर्नामेंटच्या दिवशी मात्र सकाळी रोहितचा फोन आला की त्याला फूड पॉईझनिंग झालंय आणि तो खेळायला येऊ शकत नाही तेव्हा खूप महिन्यांनी मी इतकी खूश झाले इतकी की…and I felt guilty for it, but the feeling of happiness overcame the feeling of guilt and I decided to spend that one day with you. The way you kept looking at me that whole day reminded me of Sunil looking at Anna from the movie Kabhi haan kabhi naa. But to tell you the irony, that day, we both were Sunil and we both were Anna.”

अवंतिकाला भडभडून आलं. मिहीर तिला काही बोलणार एवढ्यात तीच म्हणाली.

“Don’t worry, it’s the third beer that’s making me so emotional. It rather pushed me 15 years back. तू अमेरिकेला निघून गेलास. पण मी तुला माझ्या मनातून काढू शकले नाही. So, I broke up with Rohit. Of course I made up another reason for it. And… and time heals everything. मी स्वतःला पुढच्या अभ्यासात, माझ्या करियरमध्ये गुंतवलं आणि I got over you. And it’s the beer that has given me the courage to tell you all this.”

अवंतिका हसली आणि तिने मिहीरकडे पाहिलं.
तो गंभीर होता, शांत होता. त्याला आज धक्क्यावर धक्के बसत होते. जिला, जिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो ते सांगण्याची हिंमत नव्हती तिचंही आपल्यावर प्रेम होतं हे आज 15 वर्षांनी कळावं आणि ते ही त्याचा आता काहीही उपयोग नसताना???

तो काहीच बोलत नाही म्हणून अवंतिकाने काळजीपोटी विचारलं.

“आता ह्या गोष्टींनी आपल्या दोघांना फरक पडत नाही. म्हणून सांगितलं मी. मी सांगायला नव्हतं होतं का? Are you OK?”

“मी खूश आहे.”

मिहीर हसत पुढे म्हणाला.

“अगं खाऊ शकणार नसलो तरी फ्रिजमध्ये आईस्क्रीम आहे एवढं कारण पुरेसं आहे मला खूश व्हायला.”

अवंतिकाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं तसं त्याने सकाळचा गार्गीचा आईस्क्रीमचा किस्सा सांगितला आणि दोघं हसत रिसॉर्टमध्ये परतले.

Leave a comment