चमक

पहाटे साडेपाचचा अलार्म वाजला तशी ती उठली. अलार्म स्नूझ करून दहा मिनिटं आणखीन झोपायचा मोह होत होता. पण नंतर घाईगडबड होईल म्हणून नाईलाजाने पांघरूण बाजूला सारत ती उठली. लेकीच्या खोलीत गेली. लेक पोटावर, पार्श्वभाग वर करून आणि दोन्ही हात पोटाखाली घेऊन झोपली होती. आईच्या पोटात बाळाची असते तशी पोझ. असं लेकीला पाहिलं की तिच्या रंध्रारंध्रातून माया पाझरे. ती लेकीला कुशीत घेऊन तिथेच झोपली. तिच्या बेडरूममध्ये आवरलेला मोह लेकीच्या रूममध्ये मात्र सुटला नाही.

पण पाचच मिनिटांत ती उठली. लेकीला उठवलं. तिने डोळे न उघडताच “मला आणखीन झोपायचं आहे, मला स्कुलमध्ये जायचं नाही” रडारड सुरु केली. आई नेहमी म्हणते ती ही तुझी डिट्टो कॉपी आहे. जशी तू लहानपणी होतीस अगदी तशीच आहे तुझी लेक. तिला हे ऐकून नेहमी मऊ मऊ वाटे. एक टाईम मशीन असायला पाहिजे होतं ज्यात बसून मी स्वतःला हिच्या वयाची असताना पाहून आले असते तर किती मस्त वाटलं असतं असा विचार आजही तिच्या मनात आला तशी ती स्वतःशीच हसली.

तिने लेकीला तसंच उचललं. ब्रशिंगही बंद डोळ्यांनी उरकलं. डायनींग टेबलवर बसल्यावर मात्र ऑम्लेटच्या वासाने डोळे उघडले. डोळ्यांत एक विशेष चमक. लेकीची खाण्याची आवडही तिच्यासारखीच. तिला ऑम्लेट ब्रेड खाताना, तिच्याकडे कौतुकाने पाहत दुसऱ्या बाजूला तिचा डबा भरणं सुरु होतं. लेकीची टकळी सुरु झाली. शाळेतली मजा, स्कुलबसमधली मस्ती, कोणाच्या डब्यातला खाऊ, विषय रानात मोकाट सुटलेल्या हरणासारखे पळत होते. नाश्ता संपताच, तिचा स्कुल युनिफॉर्म, दोन पोनीटेल्स, स्कुलबॅगेत डबा, वॉटरबॉटल…तिला पटपट तयार करून ती खाली घेऊन गेली. स्कुलबस आल्या आल्या लेक पुढे पळाली. दोन पावलं पुढे जाऊन पुन्हा मागे येऊन आईला एक पप्पी देऊन, टाटा करून पुन्हा पळाली. ती बस दिसेनाशी होईपर्यंत तिथेच उभी राहिली.

खिशातला फोन वाजला तशी ती भानावर आली. तिला ऑफिसला जायला तयार व्हायचं होतं. त्यामुळे लागलीच बिल्डिंगमध्ये पळाली. घर तिसऱ्या मजल्यावर होतं पण नेहमीप्रमाणे तिने जिन्यावरून जायचं ठरवलं. पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाताना ती थबकली. आतून तुपावर बेसन भाजण्याचा वास येत होता. तो वास. तो टिपिकल वास. तिने डोळे बंद केले.

किचन. गॅसवर ऍल्यूमिनियमच्या कढईत स्टीलच्या कालथ्याने तुपावर बेसन भाजत असलेली आई. मागे भिंतीला लागून असलेलं एक फोल्डिंग डायनींग टेबल उघडलेलं. त्याच्या बाजूला एक स्टूल. स्टूल सतत पायांनी हलवून डुगडुग आवाज होतोय. त्यावर बसून एका मुलीची अथक बडबड सुरूय. शाळेतली मजा, शाळेसाठी लावलेल्या रिक्षातली मस्ती, कोणाच्या डब्यातला खाऊ, विषय रानात मोकाट सुटलेल्या हरणासारखे पळतायेत. आई हं हं करत सगळं ऐकतेय. आणि मग बेसनाचा एक लाडू आई त्या मुलीसमोर धरतेय. मुलीचे दोन पोनीटेल्स. लाडू पाहून डोळ्यांत एक विशेष चमक.

खिश्यातला फोन पुन्हा वाजला तशी ती भानावर आली. टाईम मशीनमध्ये बसून ती तिच्या लेकीच्या वयाच्या स्वतःला पाहून आल्यामुळे आताही तिच्या डोळ्यांत तीच एक विशेष चमक होती.

Leave a comment