ऑनलाईन

“भूत जेव्हा दिसत नाही तेव्हाच जास्त घाबरवतं. कुठे झक मारली आणि हा सिनेमा पाहिला.”

तिच्या मनात विचार आला. घरचे चार दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. घरच्यांना भुताखेतांच्या सिनेमात रस नव्हता, पण तिला होता. पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीवर आधारित एक पिक्चर तिला कधीचा पाहायचा होता, तो तिने आज पाहिला. ते ही रात्री. आता मध्यरात्रीचे दोन वाजले होते आणि तिचे बारा. एरव्ही ह्या genre ला बिलकुल न घाबरणाऱ्या तिची आज मात्र विकेट गेली होती. घसा सारखा कोरडा पडत होता. मध्यरात्रीच्या नीरव शांततेत एखादा अस्फुटसा आवाज तिच्या हृदयाचे ठोके वाढवत होता. तिने किचनमधून पाण्याची बाटली भरून घेतली. दाराचं डबललॉक व्यवस्थित लॉक झालंय ना ते पाहिलं. एरव्ही कधी न लावणारी दाराची वरची कडीही घातली. कधी न लावणाऱ्या त्या कडीची धूळ तिच्या हाताला लागली तसा तिने हात जोरात झटकला.

“भुताला कडीलॉकने अडवतोय आपण. वाह.”

तिच्या मनात विचार आला. पण काही प्रकारची भिती तर्कशास्त्राला जुमानत नसते, ती वाटायची तेव्हा वाटते आणि बदल्यात वाट्टेल ते करून घेते. तिने दाराचं हॅन्डल ओढून पुन्हा सगळं लागल्याची खात्री केली आणि ती मागे वळली. तिच्या पायावर काहीतरी सळसळलं तशी तिच्या छातीत धडकी बसली. महत्प्रयासाने तिने तोंडातून येणारी किंकाळी थांबवली. दाराच्या बाजूला एक टेबल होतं, त्यावर सकाळी येणाऱ्या दूधवाल्याचं बिल आणि पैसे ठेवले होते. तिने मगाशी झटकलेला हात लागून, हळूहळू सरकत ते बिल तिच्या पायावर पडलं होतं. तिने ते उचलून अक्षरशः त्या टेबलावर आपटलं. छातीतले वाढलेले ठोके अजूनही आपला स्पीड कमी करायचं नाव घेत नव्हते. तिने आधी बेडरूममध्ये जाऊन टेबललॅम्प लावला आणि पुन्हा बाहेर येऊन हॉलमधला लाईट बंद केला.

पाण्याची बाटली साईडटेबलवर ठेवत तिने AC लावला आणि टायमर अड्जस्ट करून चादर अंगावर ओढून ती बिछान्यावर पहुडली.

“ह्यापुढे कधीही घरी एकटी असताना रात्री काय दुपारीदेखील असला पिक्चर पाहणार नाही. प्लीज आता झोप येऊ देत.”

तिच्या मनात विचार आला. काही मिनिटं शांततेत गेली. ती कूस बदलत होती. छातीची धडधड नॉर्मलला आली होती. AC चा blower तिच्या दिशेने येऊन, त्या गार हवेने तिला डोळा लागणार एवढ्यात रस्त्यावरचं एक कुत्रं रडू लागलं. ती दचकून बिछान्यात उठून बसली. तिला रडूच फुटलं. पुन्हा भिती वाटायला लागली. तिने साईडटेबलवरचा फोन उचलला आणि कपाळावर हात मारला. इतरवेळी ती फेसबुक उघडून बसली असती. थोडा टाईमपास झाला असता. पण आठवडाभर तिचं काही कारणाने अकाऊंट सस्पेंड झालं होतं. म्हणजे ते ही करता येणार नव्हतं. व्हॉट्सऍप उघडायचं तर ह्यावेळेस कोण जागं असणार?

तिने तरीही व्हॉट्सऍप उघडलं. एकदोनतीन स्क्रोलमध्ये नावं नजरेखालून घातली. सगळेच झोपले असणार. स्क्रोल करता करता ती त्याच्या नावापाशी रेंगाळली. तिच्या कॉलेजमधला तिचा क्रश. क्रशपर्यंतच मर्यादित होता. त्यांची कॉलेजमध्ये असतानाही फार बोलचाल नव्हती. त्यामुळे कॉलेजनंतर कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रश्न नव्हता. बऱ्याच वर्षांनी फेसबुकवर कोणाच्या तरी पोस्टखाली कमेंट करताना, वाचताना त्याच्याशी गाठ पडली. हाय हॅलो, फेसबुक फ्रेंडशिप, व्हॉट्सऍप नंबर, चॅट्स, कॉल्स, मैत्री सगळं झालं. पण दोघांत कुठेतरी एक शुल्लक वाद झाला आणि त्याने तिच्याशी दहा दिवसांपासून बोलणं टाकलं होतं.

“गेलास उडत” तिलाही राग आला होता.

“किती बालिशपणा करतो नै, आपण?”

तिला वाटलं आणि आपण पुढाकार घेऊन वाद मिटवूया असं वाटून तिने त्याच्याशी चॅट करायला विंडो उघडली. तिने टाईप करायला घेतलं पण मेसेज सेंड करायच्या आधी मनात विचार आला की एवढ्या रात्री नको. उद्या मेसेज करु म्हणत तिने फोनचा स्क्रीन बंद केला आणि पुन्हा झोपेची आराधना करत डोळे मिटले.

“घर घर” फोनच्या व्हायब्रेशनने दोन मिनिटांत ती पुन्हा दचकून उठली.

“आज मला हार्टअटॅक आल्याशिवाय राहणार नाही”

म्हणत तिने फोन उचलून अनलॉक केला. एक व्हॉट्सऍप मेसेज दिसत होता. अरे, त्याचाच मेसेज! तिला आश्चर्य वाटलं.

“काय टाईप करत होतीस? आणि काय पाठवलं नाहीस?😁”

“अरे! तुला कसं कळलं? माझ्यावर पाळत ठेवून होतास की काय? 🤭 आणि तू अजून जागा कसा?”

“सांगतो पण हसू नकोस, आज रात्री एक हॉरर फ़िल्म पाहिली. आणि नंतर माझी फाटली. झोप येत नव्हती. फोनवर टाईमपास करत होतो. तू ऑनलाईन दिसलीस…

“What a coincidence 😱 अरे मीही आज एक पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीवरचा पिक्चर बघितला आणि खूप घाबरले. त्यात 7 दिवसांपासून माझं एफबी अकाऊंट बंद. व्हॉट्सऍप उघडलं पण लक्षात आलं की सगळेच झोपले असतील. तुझ्या नावापाशी आले आणि म्हटलं तुझ्याशी बोलावं. तू तर माझ्याशी बोलणं टाकलंस.”

“I am sorry😞”

“Unconditional sorry?🤭”

“जे समजायचं ते समज. मी इतकं ताणायला नको होतं.”

“मी ही ताणलं की. आय ऍम सॉरी टू. काय म्हणतोस बाकी?”

“मी छान. झोपायचा प्रयत्न करतो आता. तू ही झोप.”

“येस. झोप लागायला हवी ना पण. 🙄”

“लागेल लागेल. गुडनाईट.”

“Goodnight😴”

तिने फोन लॉक केला तेव्हा चेहऱ्यावर एक भलं मोठं स्माईल होतं. भिती पळून गेली होती. बिछान्यावर पडताच तिला डोळा लागला. सकाळी सातच्या अलार्मने जाग आली तसं तिने हात लांबवून फोन घेतला. नेहमीच्या सवयीने आधी फेसबुक उघडलं. काय आश्चर्य, तिचं अकाऊंट पुन्हा सुरु झालं होतं. तिने खुशीत टाईमलाईन स्क्रोल करायला घेतली.

पाहते तर काय!!! त्याला टॅग करून त्याला श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट्स दिसल्या. ती उडालीच. थोडं वाचून कळलं की एक आठवड्यापूर्वी त्याचा ऍक्सीडेन्ट होऊन तो जागच्या ठिकाणी गेला होता.

कसं शक्य आहे हे? तिला कळतंच नव्हतं. तिने घाईने व्हॉट्सऍप उघडलं. त्यांची रात्रीची चॅट विंडो उघडली. त्यांचा चॅट होताच की. आणि त्याच्याशिवाय त्यांच्या भांडणाविषयी दुसऱ्या कोणालाच माहित नव्हतं. मग आपल्याशी तोच बोलला ना? ती प्रचंड गोंधळली होती.

तिने चॅटस्क्रीन पुन्हा पाहिली. त्याचं स्टेटस तो बरोब्बर एका आठवड्यापूर्वी लास्ट ऑनलाईन असल्याचं दाखवत होतं. ती जागच्या जागी थिजली.

“भूत जेव्हा दिसत नाही तेव्हाच जास्त घाबरवतं.”

तिला दरदरून घाम फुटला.

Leave a comment