Yellow

“मॅम, तुम्ही पिवळ्या रंगाचा ड्रेस नाही घातलात तो?”

हे वाक्य कानावर पडलं तसं तिने लॅपटॉपमधून डोकं काढून कॅबिनच्या दाराकडे पाहिलं. ओपन कॅबिनच्या बाहेरून अर्धी आत डोकावत एक मुलगी विचारत होती. तिचं डोकं, मन अजूनही त्या लॅपटॉपवर खरडत असलेल्या टॉपिककडे असल्यामुळे त्या मुलीकडे नजर असली तरी खांद्यावरचा प्रोसेसर त्या दिशेने काम करत नव्हता. अंमळ टाईम डिलेनंतर ती त्या मुलीच्या विश्वात उतरली. इंजिनियरिंग कॉलेजमधून नुकतंच बाहेर पडून, एका मोठया कॉर्पोरेटचा भाग झालेल्या, एकवीस-बावीस वर्षाच्या कोवळ्या वयाला साजेल अश्या उत्साहाने फसफसलेली ती मुलगी. पहिली नोकरी, हातात येणारा पहिला पगार ह्याची मजाच काही और असते. त्यातून कंपनीचं वर्किंग कल्चर ओपन, फ्रेंडली असल्यास सण, सेलिब्रेशन साजरे करण्यात ही तरुणाई पुढे पुढे असते. अगदी घरचं कार्य असल्यासारखं ते सगळे प्रत्येक फंक्शनमध्ये सामील होतात. काँट्रीब्युशन काढण्यापासून, खाऊची ऑर्डर ते ड्रेस कोडची इमेल्स सगळ्यांना पाठवणे ते सिनियर्स, मॅनेजर्सना ह्या गोष्टीची आठवण करणे ही सगळी कामं आवडीने केली जातात. छानशी, सॅटिन प्लेन पिवळी साडी आणि लाल-हिरवा-पिवळा अश्या मिक्स रंगाच्या बांधणी मटेरियलचा स्लिव्हलेस ब्लाऊज, त्यावर माफक पण आकर्षक ज्वेलरी घातलेली मॅनेजमेंट ट्रेनी तिला तिने आज पिवळा रंगाचा ड्रेस न घातल्याबद्दल विचारत होती. साडीत अगदी गोड दिसत होती. “आईने किमान कानशीलावरून बोटं मोडून तरी दृष्ट काढली असेल.” तिच्या मनात विचार आला तशी ती त्या मुलीकडे पाहून गोड हसली.

“व्हॉट मॅम?” मुलीने लटक्या तक्रारीच्या सुरात पुन्हा विचारलं.

“सॉरी, क्षितिजा, आय जस्ट फरगॉट. नेक्स्ट टाईम फॉर शुअर. बाय द वे, तू खूप गोड दिसतेस” हसत ती म्हणाली.

“थँक यू, मॅम” क्षितिजा हसत म्हणाली.

“अँड आय नीड टु टॉक टु यू. बट लेटर इन द इवि्निंग”

“व्हॉट्स इट, मॅम? आय कॅन कम नाऊ इफ…”

“नो, नॉट नाऊ…” क्षितिजाला तोडत ती पुढे म्हणाली “इन द इविनिंग. आता जाऊन मजा करा.”

हसून तिथून क्षितिजा निघून गेली तसं तिने आपलं डोकं लिहित्या ई-मेलमध्ये पुन्हा घुसवलं.

“Kshitija is just a trainee. Such a mistake has happened due to her being new in the corporate world. Also, it can inadvertently happen from anyone, if you really think about it. The girl is otherwise brilliant and certainly deserves a second chance.”

ती पुढे लिहीत राहिली. क्षितिजाकडून चुकीने एक ई-मेल क्लायंटला गेलं होतं. जवळपास क्लायंटच्या नावाचा आणखीन एक माणूस त्यांच्या ऑफिसात होता. त्याला CC करायच्या ऐवजी क्षितिजाने चुकून क्लायंटला ईमेल केलं होतं. ईमेल मधली माहिती सेन्सिटिव्ह नसली तरी कॉन्फिडेन्शियल होती आणि कंपनी रुल्सनुसार क्षितिजाला सॅक करण्यात यावं असं मॅनेजमेंटचं म्हणणं होतं. सकाळी घरूनच मेलबॉक्स ओपन केला तेव्हा ही ईमेल्स दिसली आणि तेव्हापासून तिची ही बॉस क्षितिजासाठी खिंड लढवत होती. त्याच गडबडीत तिने आजचा कलर कोड विसरून हाती लागेल ते इस्त्रीतले कपडे अंगावर चढवले होते. क्षितिजाला डिफेन्ड करत तिने खरमरीत रिप्लाय पाठवला आणि लॅपटॉपच्या बाजूच्या व्हाईटबोर्डवरच्या येलो पोस्ट इट्सवर तिची नजर गेली. बाजूच्या मगातून कॉफीचा सिप घेत तिने एक पोस्ट इट काढून केराच्या डब्यात टाकली.

त्यावर लिहिलेलं होतं “wear yellow on 7th October.”

Leave a comment