स्ट्रॉंग

रविवार सकाळचे नऊ वाजले असतील. मयूर नुकताच त्याचा व्यायाम आटपून चाळीच्या बाल्कनीत उभा होता. सहा फुटाच्या आतबाहेरची उंची आणि व्यायामाने आणखीन कमावलेली मूळची धिप्पाड शरीरयष्टी. बनियानवर असल्यामुळे आणि व्यायामामुळे दंडावर आलेल्या घामामुळे शरीर टिचभर जास्त पिळदार दिसत होतं. शेजारच्या वसूवहिनीच्या घरचं दार उघडून तिथल्या फिरत्या टेबलफॅनचा वारा आला तसा मयूर सुखावला. आजूबाजूला गजबज होती. कोणी काकू कोण्या वहिनीशी गप्पा मारत होती, कुठले अण्णा चहाची आणि ‘प्रेशर’ची वाट पाहत बाल्कनीत येरझाऱ्या घालत होते, कुठे टीव्हीचा आवाज, कोणाच्या हातातल्या काळ्या पिशवीतून मटणमच्छी बाजारातून घरी प्रवास करत होतं. तयार मटणाच्या वासाच्या कल्पनेने त्याच्या तोंडात पाणी आलं आणि भूक खवळली. खाली चाळीतली आठदहा वर्षांची तीनचार पोरं खेळत होती. त्यात शेजारचा बंटीही होता. काहीतरी झालं आणि पोरं भांडायला लागली. बघता बघता बंटी व्हर्सेस बाकीची टीम झाली आणि त्यांनी त्याला घेरून त्याचं बखोट पकडलं. प्रकरण पुढे जायच्या आत वरून मयूर ओरडला “एsss काय चाललंय? सोडा त्याला”. पोरांनी वर पाहिलं, बंटीचं धरलेलं बखोट सोडलं आणि पोरं पांगली.

बंटी रडत रडत वर आला. वसूवहिनीने म्हणजे बंटीच्या आईने त्याला पाहिलं आणि कारण कळल्यावर त्याला ओरडलीच “रडत का आलास? अरे, कोणी दोन दिले तर आपण चार परत करायचे. मयूरदादाकडे बघ, आपल्याला असं स्ट्रॉंग व्हायचं आहे, रडत बसायचं नाहीये”. आपल्या नावाचा उल्लेख ऐकून मयूरने वळून पाहिलं आणि हसला. वसूवहिनी घरात निघून गेली. बंटी मयूरजवळ गेला आणि त्याने त्याच्या दंडाला हात लावला. मयूरने दंडाचे स्नायू फ्लेक्स करून दाखवले तसे दोघे एकमेकांकडे पाहून हसले.

बंटी गॅलरीत बॉलने खेळायला लागला आणि मयूरने त्याची नजर पुन्हा बाहेर वळवली. तशी ती दिसली. त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. जुई. त्याची गर्लफ्रेंड. सॉरी, एक्स गर्लफ्रेंड. नातं तुटायच्या म्हणजे तिने तोडायच्या आधी दोन वर्षं प्रेमात होते दोघे. चाळीत कोणाला कळू नये म्हणून दोघांनी पुरेपूर काळजी घेतली होती. एकमेकांना मेसेजेस देण्यापासून ते भेटण्यापर्यंत, किसीको कानोकान खबर ना हुई. फक्त तिच्या घरी माहित होतं, तेही जेव्हा तिने सांगितलं तेव्हाच. तिच्या घरून विरोध होता. कारण? ते महत्वाचं नाही पण विरोध होता हे तिच्यासाठी महत्वाचं होतं. ती त्याला नको म्हणाली. त्याची लढायची तयारी होती पण तिची नव्हती. मग मोहोब्बत थी इस लिए इसने जाने दिया. त्यांच्या प्रेमाची ती दोन वर्षं झरझर त्याच्या डोळ्यासमोरून गेली.

“जुईला त्या भोसल्यांकडे दिलीय ना?”

वसूवहिनीने “सटाक” ओल्या टॉवेलचा आवाज करत, खाली जुईकडे पाहत त्याला विचारलं आणि टॉवेल वाळत घातला. त्याच्या हृदयावर आसूड बसावा तसा तो प्रश्न. “सटाक”. त्याने मान हलवून हो म्हटलं. “भोसल्यांकडे दिलीय ना”. त्यावरून त्याचं जुईशी झालेलं बोलणं त्याला आठवलं. बीचवर दोघे आईस्क्रीम खात बसले असताना जुई तिच्या कुठल्या मैत्रिणीबद्दल बोलत होती.

“शारदाला जोश्यांकडे दिलीय”

“दिलीय म्हणजे?”

“दिलीय म्हणजे लग्न करून ती जोश्यांकडे गेलीये”

“मग तसं म्हण की. ती काय वस्तू आहे का द्यायला?”

“अरे असं म्हणायची पद्धत असते.”

“उठसूठ फेमिनीझम फेमिनीझम करणाऱ्या मुलीला हे बरं कसं चालतं? ही म्हणायची पद्धत असली तरी तिच्या बेसिकमध्ये गडबड आहे हे कळत नाही का?”

फार गोड हसली होती जुई तेव्हा. प्रचंड प्रेम दाटून आलं होतं तिच्या डोळ्यात. त्याच्या डोळ्यात बघत तिने बोटाने त्याच्या तोंडाच्या कडेला लागलेलं आईस्क्रीम पुसलं. पुन्हा वसुवहिनीच्या कुठल्यातरी कपड्याच्या सटाक आवाजाने तो भानावर आला. गेल्याच महिन्यात जुईचं लग्न झालं होतं. त्यानंतर माहेरी आली असावी. स्कुटरवर, तिच्या बाबांच्या मागे बसून कुठेतरी निघाली होती. मयूर आणि ती, दोघे रिलेशनशिपमध्ये असताना ती अशीच स्कुटरवरून निघाली की वर पाहायची. त्याच्या घराच्या दिशेने. तो तिथे असला की हमखास नजरानजर होऊन दोघे खूश व्हायचे आणि मग नजर चाळभर फिरून खात्री करायचे कोणी पाहिलं नाही ना.

“आता पाहेल का ती?” त्याच्या मनात “पलट पलट पलट” म्हणायचा अवकाश आणि तिने स्कुटरवरून त्याच्याकडे पाहिलं. त्याला दुखऱ्या जखमेवरून हलकी फुंकर मारल्यासारखं वाटलं. दोघांची नजरानजर झाली आणि तिने तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राच्या वाट्यांना हात घातला. त्याला हृदयात कोणीतरी खंजीर खुपसतोय असं वाटलं. स्कुटर टरटर आवाज करत निघून गेली आणि त्याच्या डोळ्यांतून संततधार वाहू लागली.

बाजूला खेळत असलेला बंटी ओरडला

“आईsss स्ट्रॉंग मयूरदादा पण रडतो, बघ.”

Leave a comment