श्रीमंती

सकाळी सहाच्या अलार्मने तिला उठवलं. सहा वाजलेत माहित असूनही तिने हात लांबवून मोबाईल फोन हातात घेऊन डोळे किलकिले करत वेळ पाहिली. “पाच वाजले असते तर आणखीन एक तास झोपायला मिळालं असतं” रोजचा फक्त तो एक सहाचा अलार्म फोनमध्ये असूनही तिच्या मनात विचार आला. दहा मिनिटं स्नूझ करून सहा दहाला उठते म्हणून तिने अलार्म दहा मिनिटं पुढे ढकलला. उबदार पांघरुणात शिरून ती पुन्हा झोपली. सुख म्हणजे आणखीन काय? रोजच्या अलार्मकडून चोरलेली दहा मिनिटांची झोप, मनात विचार आला तसं चेहऱ्यावर एक गोड स्माईल आलं. सहा दहा झाले तशी ती उठली. दहा मिनिटांची ती झोप तिची बॅटरी 100% चार्ज करून गेली होती.

तिने बाजूला पाहिलं. कुले वरच्या दिशेने करून पोटावर झोपलेला तिचा लेक, डोळ्यावर, कपाळावर बेफिकीरीने रूळणारे त्याचे मऊ केस, डोक्याखाली एक हात, गुडघ्यात दुमडलेला एक पाय आणि दुसरा पाय त्याच्या बाबाच्या पोटावर, किती ते लोभस रुप. ती पुन्हा हसली. नजर आता लेकाच्या बाबाकडे गेली. लेकाने बाबाचा चेहरा घेतला होता. काल झालेलं त्यांचं भांडण तिला आठवलं. त्याच्याशी कचाकचा भांडल्यावर मग त्याच्याच चेहऱ्याचा लेक तिच्याजवळ आला की तिची गोची होते. तिला फिसकन हसू येतं. रागाचा पारा सर्रकन खाली उतरतो म्हणून स्वतःचा रागही येतो. चालायचंच. लेक झाल्यापासून दोघांना मनसोक्त भांडताही येत नाही अशी तिची लाडकी, लटकी तक्रार. सगळं आठवून ती पुन्हा हसली.

फोन सहा पंधरा वाजलेले दाखवत होता. बिछान्यावरून उठून तिने ब्रश केलं आणि कॉफी करायला ठेवली. “आता मस्त पंधरा मिनिटं स्वतःला द्यायची” ठरवून तिने कॉफी मगात ओतली. रोजचा असा प्लॅन असतो तिचा, स्वतःला वेळ द्यायचा, पण अधेमध्ये कामं डोकावत असतात. डिशवॉशर रिकामी करायचा असतो, नाश्त्याला करायच्या सांबारसाठी डाळ भिजत घालायची असते, वेळेत कपडे धुवून यावेत म्हणून वॉशिंग मशीनला टाकायचे असतात इत्यादी इत्यादी. आणि मग ऑटोमॅटिकली, यंत्रवत ती ही कामं आटपायला घेते आणि परत येईस्तोवर कॉफीने गरम ते कोमट अंतर पार केलेलं असतं. आज मात्र ठरवून तिने ह्या कामांकडे काणाडोळा केला. ताज्या, गरम कॉफीचा घोट गळा शेकून गेला. तसं तिच्या चेहऱ्यावर पुन्हा स्माईल आलं.

कॉफी पिता पिता तिने फोनवर फेसबुक उघडलं. कोव्हीडच्या बातम्या, राजकीय रणधुमाळी, आरोप, प्रत्यारोप, हे सहन न होऊन ती फेसबुक बंद करणार एवढ्यात एका पोस्टकडे तिचं लक्ष गेलं. “आताच्या निराशाजनक, निगेटिव्ह वातावरणात चेहऱ्यावर जेन्यूईन स्माईल येईल असा एक क्षण आला तरी तो भरभरून जगून घ्या, असा एक क्षण असला तरी तुम्ही श्रीमंत”. तिने बोटं मोजली. आज सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी उठून ते आता सहा वाजून पस्तीस मिनिटं म्हणजे पंचवीस मिनिटांत तिच्या चेहऱ्यावर तब्बल चार वेळा गोड, जेन्यूईन स्माईल येऊन गेलं होतं.

त्या श्रीमंतीने तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एक स्माईल आलं.

Leave a comment