ब्ल्यू

“मंजिरीsss”

अशी आर्त हाक मारत अभय आज मध्यरात्री पुन्हा दचकून उठला. संपूर्ण शरीर घामाने डबडबलेलं. तो बिछान्यावर उठून बसला. गळ्यातलं जानवं सरळ केलं आणि पाणी प्यायला ठेवलेली साईड टेबलवरची बाटली हाती घेतली. ती रिकामी होती. पाणी भरण्यासाठी तो किचनमध्ये गेला. माठाच्या नळातून बाटली भरताना विचारचक्र सुरु झालं. आजचा तिसरा आठवडा आणि तेच स्वप्न. मंजिरी म्हणजे त्याची बायको. ती गरोदर आहे. तिला नॉनव्हेज खायचे खासकरून मासे खायचे डोहाळे लागलेत. अभय तिला विचारतोय की हे असलं तिने आधी कधी खाल्लेलं नाही मग तिला हे डोहाळे कसे लागले? तेवढा एक प्रश्न आणि मंजिरीचा रागीट, गंभीर चेहरा. नाही, चेहरा नाही फक्त डोळे. सुंदर, गहिरे, निळेशार डोळे. बाहुल्यांचे असतात तसे. त्याच्यावर रोखलेले. आणि ती तिथून गायब होते. त्याला उत्तर न देता. जणू काय तिचे डोहाळे न पुरवण्याची ती त्याला शिक्षा देते. “मंजिरीsss” अभय हात लांब करून तिला आर्त हाक मारून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती गेलेली असते.

हेच एक स्वप्न त्याला तीन आठवड्यांपासून पडतंय. गंमत म्हणजे ना अभयचं लग्न झालंय ना तो मंजिरी नावाच्या मुलीला ओळखत. तो जन्मापासून शाकाहारी, अगदी अंड्याच्या वासालादेखील उभा न राहणारा. तरी तीनदा तेच स्वप्न. त्याने पाण्याची आख्खी बाटली रिकामी केली तसं त्याला थोडं बरं वाटलं. ह्यापूर्वी हे असं कधी झालं नव्हतं. म्हणजे अभयला स्वप्नं पडत, विचित्र स्वप्नंही पडत. पण कुठलंही स्वप्न असं पुन्हा पडलं नव्हतं. त्याने इंटरनेटवर स्वप्नाबद्दल, त्यांच्या अर्थाबद्दल शोधून पाहिलं. पण काही विशेष सापडलं नाही.

“अरे, तुझ्या वयातल्या पोरांना नॉनव्हेज स्वप्नं पडायचीच. पण ते नॉनव्हेज वेगळं”

दुसऱ्या दिवशी ऑफिसात डबा खाताना एक सिनियर कलीग त्याच्या स्वप्नाची गोष्ट ऐकून दुसऱ्या कलीगला डोळा मारत म्हणाले. जेवण संपवून हात धुताना बाथरूमच्या खिडकीतून त्याची नजर रस्त्यावर गेली. चहाची टपरी उघडी दिसली. तीन आठवडे बंद असलेली त्याची रोजची टपरी उघडी पाहून अभयला बरं वाटलं. तो पाय मोकळे करत टपरीवर गेला. टपरीवाला रवी तीन आठवडे गावी गेला होता आणि आजच उगवला होता.

“काय अभय शेठ…कसा काय?” त्याने हाताने सलाम ठोकत विचारलं.

“सगळं मस्त, रवी. गावात, घरात सगळे कसे आहेत?”

“समदे छान…काय देऊ? कटिंग चाय आणि पार्ले जी?”

अभयचा दुपारच्या जेवणानंतरचा नेहमीचा खुराक. त्याने हसून दुजोरा दिला.

कटिंग चहाचा सिप घेत आणि बिस्कीट खात तो तिथे उभा राहिला.

“म्यांsssव” करत रवीच्या टपरीच्या आजूबाजूला फिरणारी मांजर तिथे आली. अभयच्या पायाला डोकं घासू लागली. तसं अभयने एक बिस्कीट तिच्यासमोर टाकलं. ती फिस्कारली.

“ती आता हे खानार नाय. पोटुशी आहे ती एक महिन्यापासून. तिला आता फकस्त मच्छी लागते” चहा उकळत रवी म्हणाला.

अभयने मांजरीकडे पाहिलं तसं तिनेही त्याच्याकडे पाहिलं. तेच ते रोखलेले डोळे. त्याच्या स्वप्नातले. सुंदर, गहिरे, निळेशार डोळे. बाहुल्यांचे असतात तसे. तीन आठवड्यांपूर्वी अभयने तिला असंच एका दुपारी एक बिस्कीट देऊ केलं होतं. ती अशीच फिस्कारून तिथून निघून गेली होती. मंजिरी…मांजर…मंजिरी…निळ्या डोळ्यांची. अभयच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आलं.

ऑफिसहून निघताना त्याने जानवं काढून ड्रॉवरमध्ये ठेवलं. घरी जाण्याच्या आधी तो जीव आणि नाक मुठीत घेऊन बाजूच्या मच्छीबाजारात गेला.

Leave a comment