फाईव्ह स्टार

आपल्याकडच्या किल्ल्यांनी सरनाईकांच्या घराचं दार उघडून, घामाघूम झालेली मंदा आत आली. सकाळचे अकरा वाजले होते. आज नेहमीसारखी नऊच्या आत काम आटपून जायची घाई नव्हती कारण दोनतीन दिवसांसाठी मंडळी बाहेरगावी गेली होती. घरात मिस्टर आणि मिसेस सरनाईक आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा कुणाल, असं त्रिकोणी कुटुंब. मिस्टर सरनाईक कुठल्याश्या बँकेत होते. मिसेस सरनाईक ट्युशन घ्यायच्या, बरोबर नऊला सुरु होणारी पहिली बॅच. त्यामुळे मंदाला तिचं काम नऊच्या आत संपवावं लागे. मॅडमच्या क्लासेस मध्ये अजिबात व्यत्यय नको म्हणून. रोजची केर काढणे, लादी पुसणे आणि आठवड्यातून एकदा आठवड्याभराच्या भाज्या धुवून, चिरून, झिप लॉकमध्ये भरून ठेवणं ही तिची कामं. महिना 2000 रुपये पगार. मंडळी काल गेली आणि दुसऱ्या दिवशी येणार होती. “तीन दिवसांत एकदा येऊन केर, पुसणे करून जा” मॅडम म्हणाल्या त्यामुळे मंदा आज आली होती.

आल्या आल्या तिने हॉलचा एसी लावला. इतर वेळी फक्त पाहुणे आले आणि खूप उकडत असल्यास तो लागायचा. फ्रीज उघडून तिने दरवाज्याला खोचलेली कैरीच्या पन्हयाची बाटली काढली. तिनेच गर काढून दिला होता. मस्त सरबत बनवून घेतलं. कोणाला कळणार होतं? एसी आणि पन्हयाचा गारवा तिला सुखवून गेला. दहा मिनिटांत घाम वाळला आणि तिला तरतरी आली. तशी ती कामाला लागली.

फ्रिजरमधून वेगवेगळ्या झिप लॉकमध्ये तिनेच ठेवलेल्या भाज्यांपैकी तिने थोडे मटार, फ्लॉवर, गाजर बाहेर काढून ठेवले. कांदा चिरायला घेतला. बॅकग्राऊंडला मिसेस सरनाईकांचं गेल्या आठवड्यातलं फोनवरील संभाषण तिला आठवत होतं. मैत्रिणीशी बोलत होत्या बहुतेक.

“आम्ही पुढल्या आठवड्यात अमुक अमुक रिझॉर्टला चाललोय. तीन दिवस आणि दोन रात्रींचं पॅकेज आहे.”

“हो हो… तेच ते फाईव्ह स्टार रिझॉर्ट. नाश्ता, जेवणं, एसी बेडरूम्स सगळं इन्कलुझिव.”

“तर तर… महाग आहेच… टॅक्स पकडून टोटल झाली ह्यांच्या महिन्याच्या पगाराच्या एक दशमांश, म्हणजे बघ ना.”

“पण नेहमी नेहमी कुठे जातो गं आम्ही. कुणालही बिचारा लॉकडाऊनमुळे दीड वर्षं घरी बसून वैतागला होता. म्हटलं होऊ दे खर्च.”

मंदाने काढलेल्या भाज्या एकदा निरखून पाहिल्या. थोडा बासमती तांदूळ घेतला. कोणाला कळणार होतं? तिने बासमती तांदूळ नाकाला लावला. अहाहा! काय खुशबू. तांदूळ धुवून भिजत ठेवला आणि तोवर बाकीची तयारी केली. साजूक तूप, खडा मसाला, कोथिंबीर, मसाले. मॅडम बासमती तांदळाचा पुलाव करताना अनेकवेळा तिच्या घ्राणेंद्रियांनी तो चाखला होता. आज ती तो प्रत्यक्षात खाणार होती. पातेल्यात जिरं साजूक तुपात नाजूकपणे तडतडू लागलं. खडे मसाले पडले आणि मंदा जणू ट्रान्समध्ये गेली. मसाला, भाज्या, तांदूळ घालून एकदा परतून तिने पाणी घातलं आणि मिठाची चव बघून झाकण ठेवून आपल्या कामाला लागली.

बासमतीच्या सुगंधाने घर आणि तिचं रोमरोम भरून गेलं. केर काढून झाला तसा पुलावही झाला. तिने लादी पुसली आणि हातपाय धुतले. गरमागरम पुलाव वाढून घेतला. अन्न इतकं चविष्ट आधी कधीच लागलं नव्हतं. तिने चार घास जास्तच खाल्ले. तृप्तीची एक ढेकर देऊन, पुन्हा एसी चालू करून ती सोफ्यावर झोपली. दोन तासांनी जाग आली. सुख म्हणजे आणखीन काय असतं. ती स्वतःशीच हसत उठली. जेवणाची सगळी भांडी घासून, पुसून ठेवली. एसी बंद केला. एकदा सबंध घरात फिरून आपण काय केलंय हे त्यांना कळणार तर नाही ह्याची खातरजमा करून घेऊन मंदा जायला निघाली.

दारापाशी जरा घुटमळली. हातांच्या बोटांवर कसलासा हिशोब केला. ब्लाऊजमध्ये ठेवलेलं पाकीट काढलं, त्यातून 200 रुपये काढले आणि दाराजवळच्या कुणालच्या पिगी बँकमध्ये टाकत, “फाईव्ह स्टार…होऊ दे खर्च” म्हणत, हसत बाहेर पडली.

Leave a comment