निमित्त

ती सटासट भेंडी कापत होती.

“भांडण करायला निमित्त हवंय तुला असं वाटतंय” तो म्हणाला. तीनचार तासांपूर्वी अगदी नॉर्मल दिवस सुरु होता. आज सुट्टीचा दिवस. निशा उठली. आदित्य आधीच उठला होता त्यामुळे चहा तयार होता. तिने पटापट ब्रेकफास्ट बनवला. आज आयुषला घेऊन मॉल मध्ये जायचं होतं. तिकडे गेमझोनमध्ये मुलांसाठी नवीन गेम्स आलेत ही खबर लागल्यापासून त्याने “मॉलला घेऊन चल” म्हणून हैराण करून सोडलं होतं. निशालाही थोडी खरेदी करायची होती. आदित्यला शॉपिंगचा तिटकारा. त्यामुळे मायलेक दोघेच गेले.

आयुषला गेमिंग झोनमध्ये सोडून निशा तिथेच बाहेर रेलिंगला रेलून आजूबाजूला न्याहाळत असताना कानावर हाक आली “निशाsss”.

पेटती वात तेलात बुडताना चर्रर्र व्हावं तसं तिच्या काळजात झालं. तो आवाज. तिने गर्रकन वळून पाहिलं. रवी उभा होता. मंद हसत, तिच्याकडे पाहत, तिच्यापासून फार फार दूर गेलेला नव्हे तिनेच फार फार दूर लोटलेला रवी आता तिच्यापासून तीन फुटांवर उभा होता.

ती दहा वर्षं मागे गेली. दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं कॉलेजात. आणि मग प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम. प्रेमात असताना गुलाबजाम असल्यासारखं वाटायचं. आजूबाजूला फक्त प्रेमाचा पाक. प्रेमाच्या गाठीभेटी, आणाभाका, भावी आयुष्याची स्वप्नं रंगवता रंगवता कॉलेज संपलं. दोघं नोकरीला लागले. तिने रीतसर घरी सांगितलं. तिथेच सारा गोड प्रवास संपला. रवी जातीतला नव्हता म्हणून निशाच्या वडिलांनी नकार दिला.

“एकदा भेटून तर पहा.”

“काय पाहू? तू निवडला आहेस म्हणजे मुलगा लाखात एक असणार. पण जातीबाहेर आहे. मला ज्या समाजात राहायचं आहे, त्याचे टोमणे मला सहन होणार नाहीत. तू सजाण आहेस. आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी आहेस. तुझा निर्णय घ्यायला मोकळी आहेस. फक्त एक, त्या मुलाबरोबर लग्न करणार असशील तर आपले संबंध संपले समज.”

वडिलांचं बोलणं अगदी स्पष्ट आणि सुरीच्या धारेसारखं. आता तीच धार कुठल्या नात्यावर फिरवायची ते तिच्याच हातात होतं. शेवटी जन्मदात्या वडिलांच्या बाजूने कौल देत तिने रवीला नकार दिला. ढगफुटी व्हावी तशी रडली होती ती त्याच्यासमोर. कुठेतरी तिला वाटत होतं की त्याने त्रागा करावा, चिडावं, नाही तुला सोडू शकत म्हणावं. पण रवी मुळात समजूतदार होता. त्यात त्याचं तिच्यावर प्रचंड प्रेम. ती इतकी दुखावली आहे म्हंटल्यावर तिला आणखीन दुखवायला नको म्हणून त्याने शांतपणे तिचा निर्णय मान्य केला. आणि शांतपणे तिच्या आयुष्यातून निघून गेला. नाही म्हणायला त्यानंतर एकदा बहुतेक मित्रांबरोबर बसला असताना दारूच्या नशेत त्याने तिला एक मेसेज केला होता “रवीला निशा मिळणं निसर्गालाही मान्य नसतं, आपण तर माणसं”. फार जिव्हारी लागलं होतं तिला. पण त्यानंतर त्याने ना मेसेज केला ना फोन. तिच्याबरोबरचे सगळे पाश तोडून टाकले. नंतर अमेरिकेला गेलाय असं कळलं ती त्याच्याबद्दलची शेवटची बातमी.

वडिलांच्या म्हणण्यानुसार निशाने अरेंज्ड मॅरेज केलं. नियतीची क्रूर गंमत अशी की तिच्या नवऱ्याचं नाव आदित्य. निशा रवीला नाही पण आदित्यला मिळाली. सूर्याची दोन नाव पण तिला हवा तो सूर्य तिला मिळाला नाही. तिने मनाशी ठरवून टाकलं होतं की निशा रवीला नाही तर आदित्यलाही मिळणार नाही. एका बायकोची सगळी कर्तव्य पार पाडेन पण प्रेम करणार नाही त्याच्यावर. निशा जे जे ठरवेल ते हाणून पाडायचं असं नियतीने बहुतेक ठरवून टाकलं होतं. आदित्य स्वभावाला गोड, मिश्किल, समजूतदार, सेन्सिटिव्ह. निशाच्या मनातली बंडखोरी लग्नाच्या सहा महिन्यांत आदित्यच्या प्रेमात विरघळली. And they lived happily ever after म्हणता येईल असा संसार सुरु झाला. तीन वर्षांनी आयुष जन्माला आला. त्यालाही सहा वर्षं झाली.

“हॅलो, निशा, ओळखलंस ना मला?”

रवीच्या प्रश्नाने ती वर्तमानात परतली. काय उत्तर देणार होती ती त्याच्या प्रश्नाला.

“कसा आहेस?” विचारताना तिच्या लक्षात आलं की त्याने तिचं फेव्हरेट कॉम्बिनेशन घातलं होतं. पांढरा फुलशर्ट आणि निळी जीन्स. तिचं आवडतं कॉम्बिनेशन म्हणून तो तिला भेटायला तेच कॉम्बिनेशन घालून यायचा. आजही तेच. त्याला माहित होतं का मी इथे येणार आहे ते? कसं शक्य आहे? अजूनही प्रेम करत असेल का माझ्यावर? लग्न केलं असेल? तिने भरकन त्याच्या हातांवर नजर फिरवली. छे, हा काय हॉलिवूड सिनेमा आहे का मॅरीड लोकांनी अंगठी घालून फिरायचा.

“मी मजेत. तू कशी आहेस?”

रवी म्हणाला तसं तिच्या तोंडून शब्द सांडलेच.

“तुझी मिसेस?”

“मी लग्न केलं नाही” तो मंद हसत म्हणाला.

“का?” हा शब्द तोंडात विरून राहिला कारण तेवढ्यात आयुष त्याचा गेम संपवून तिच्याकडे धावत आला.

रवीलाही त्याच्या मित्राने हाक मारली.

“चल बाय” म्हणून रवी निघून गेला.

निशा तिथेच थिजून राहिली. पाण्याच्या शांत डोहात कोणीतरी दगड मारून आतल्या शेवाळासकट ढवळून काढावं अशी तिची अवस्था झाली. “मी लग्न केलं नाही.” म्हणजे अजून केलं नाही की करणारच नाहीये? अजून शब्द वापरला नव्हता त्याने. म्हणजे? अजूनही प्रेम करतो हा माझ्यावर? तिला धाय मोकलून रडायचं होतं पण तसाही आयुष आईच्या तणावग्रस्त चेहऱ्याकडे पाहून “आई, काय झालं?” पुन्हा पुन्हा विचारत होता. महत्प्रयासाने तिने रडू आवरलं आणि आयुषला घेऊन घरी निघाली. एकापाठोपाठ एक विचार, प्रश्न, सगळे रवीभोवती फिरणारे. “रवी लग्न करेल ना? करेल ना?”

तिचं डोकं भंडावून गेलं होतं.

घरी आली तसं आदित्यने नेहमीप्रमाणे थट्टामस्करी करायला सुरुवात केली. ती त्याच्याशी फटकून वागत होती. त्याने कॅलेंडरकडे पाहत म्हटलं.

“अरे पण आताच होऊन गेली तुझी त्यामुळे हे PMS दिसत नाहीयेत”

“Stop it! Will you? प्रत्येक गोष्टीत मस्करी करायलाच हवी असं नाहीये.”

ती एका बाजूला सटासट भेंडी कापत होती. “भांडण करायला निमित्त हवंय तुला असं वाटतंय” तो म्हणाला. तेवढ्यात सुरीचं धारदार पातं तिच्या बोटावरून फिरलं आणि रक्ताची चिळकांडी उडाली. “भांडण करायला नाही रे, रडायला” मनात म्हणत तिने “स्सsss” ओरडत डोळ्यात थांबवलेल्या पाण्याला वाट करून दिली.

Leave a comment