शाप

केदार एका जुनाट, कळकट ढाबावजा उपाहारगृहाच्या बाहेर ठेवलेल्या बाकड्यावर बसून चहा पीत होता. दुपारचे बारा वाजले होते. घरून निघून त्याला पाच तास झाले होते. कुठल्यातरी गावापाशी एक छोटं जंगल होतं जिथे एका दुर्मिळ जातीचा पक्षी पाहण्यात आला होता, त्याचे फोटो काढायला त्याला त्याच्या मॅगझीनने पाठवलं होतं. खरं पाहता त्याचा आज इथे यायचा मूड नव्हता कारण सकाळी अंगात जरा तापाची कणकण जाणवत होती. बायकोही म्हणत होती नको जाऊस म्हणून. केदार बायकोसोबत दोन दिवसांनी गोव्याला जाणार होता, आठवड्याभरासाठी. फोटो द्यायची डेडलाईन विचारात घेता तो गोव्याहून परत आल्यावर गेला असता तरी चालण्यासारखं होतं. पण ऑफिसात नवीन लागलेला त्याचा कलीग साहेबाच्या सतत पुढेमागे करून केदारच्या कानामागून तिखट व्हायचा प्रयत्न करत होता आणि तसं वागणं केदारच्या स्वभावात बसत नसल्यामुळे परफॉर्मन्स हा एकच क्रायटेरिया त्याच्याकडे होता.

त्यामुळे त्याच्या मनाने ठरवलं होतं की ती असाइनमेंट पूर्ण करून मगच निवांतपणे गोव्याला जायचं. आणि म्हणून तो हट्टाने आज सकाळीच कंपनीच्या कारने निघाला होता. भ्रमंतीचा जॉब, भ्रमंतीची आवड असल्यामुळे त्याचा भूगोलाचा अभ्यास गाढा होता. तसं असूनही जिथे जायचं त्या गावाचं नावही त्याने आधी ऐकलेलं नव्हतं. पुणे ते जळगाव प्रवासात कुठल्यातरी बायपास रोडने आत जाऊन ते गाव होतं आणि त्याला ओलांडून ते जंगल. पाच तास ड्राइव्हिंग करून तो थकला होता. शेवटी जे पहिलं रेस्टोरंट दिसलं तिथे तो काहीतरी खाण्यासाठी उतरला. गल्ल्यावर पेपर वाचत बसलेला मालक आणि एक पोऱ्या सोडून तिथे चिटपाखरूदेखील नव्हतं. माश्या होत्या आणि काचेच्या कपाटातून दिसणाऱ्या वड्यांवर घोंघावत होत्या. त्याच्या पोटात ढवळलं, भूक तिथेच मेली. पण तो थकला होता आणि पुढे दोनेक तासांचा प्रवास करून, जंगलात फोटो काढून त्याला घरी परतायचही होतं. त्यामुळे त्याने नाईलाजाने चहा मागवला आणि चहा पीत तो तिथल्या एका बाकड्यावर बसला. एवढ्या वेळात बायकोचा फोन कसा आला नाही असा विचार करत त्याने मोबाईल फोन हातात घेतला. नेटवर्कची रेंज नव्हती.

मोबाईल रिस्टार्ट करून तो स्क्रीनकडे पाहत होता एवढ्यात त्याला त्याच्या फोन स्क्रीनवर एक सावली दिसली आणि त्याने मागे वळून पाहिलं. खांद्यावर झोळी, अंगात विटके कपडे, गळ्यात कवड्यांची माल घातलेला, केस, दाढी वाढवलेला, समोरचे दोन पिवळे-चॉकलेटी दात बाहेर दिसत असलेला एक माणूस त्याच्या खांद्यावरून त्याच्या फोनमध्ये डोकावत होता. केदार दचकला आणि हातातला चहा त्याच्या हातावर सांडला. “ओह शिट” ओरडत केदार तिथून उठला. तसा तो माणूस जोरजोराने, मान हलवून हसायला लागला. केदार बाजूला होऊन त्याच्याकडे पाहत होता.

“काय हवंय? असं माझ्या फोनमध्ये का डोकावत होतात?” केदारने चिडून विचारलं.
“मला पैसे हवेत. साधूला पैसे दे, तुझं कल्याण होईल” तो पुन्हा हसायला लागला. त्या हसण्यात केदारला वेडाची किंचित झाक दिसली.
“नाही. मी नाही देत असे कोणाला पैसे. प्लीज इथून जा” आधीच वैतागलेला केदार चिडून म्हणाला.
तसं त्या माणसाचं हसणं लाईटचा स्विच ऑफ करावा तसं बंद झालं आणि तो म्हणाला “मरशील आज तू साप चावून”. त्याने हाताची मूठ उघडून त्यात केदारच्या दिशेने फुंकर मारली आणि पुन्हा हसायला लागला.

वेड्या माणसाच्या नादी लागण्यास काही अर्थ नाही असा विचार करून केदार तिथून उठून आत गल्ल्याकडे निघाला. चहाचे पैसे देत त्याने मालकाला विचारलं “हा लोकल आहे का इकडचा?”
“कोण?” मालकाने पेपरातून डोकं काढत विचारलं.
“हा माणूस” म्हणत केदारने मागे वळून हात केला. माणूस गायब होता.
“अहो, आताच एक माणूस होता माझ्याकडे पैसे मागत. तुम्ही नाही पाहिला?”
“नाही” म्हणत मालकाने खांदे उडवले. केदारही फार विचार करायच्या मनस्थितीत नव्हता. पैसे देऊन तो रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या आपल्या कारकडे गेला. गाडीत बसला, गाडी तापली होती. इतक्यात एसी चालू नको करायला म्हणून त्याने काच खाली घेतली तसा तो माणूस पुन्हा तिथे दिसला. कारपासून एक फुटावर उभा राहून तो केदारकडे पाहत होता. केदार पुन्हा दचकला. त्या माणसाने खांद्यावरच्या झोळीतून बिडीचं पाकीट काढलं आणि बिडी तोंडात ठेऊन खुणेने “माचीस आहे का?” केदारला विचारलं. केदारने त्याच्याकडे रोखून पाहत काच वर केली, FM लावला, एसी लावला आणि गाडी स्टार्ट केली. पुढे जाताना साईडच्या आरशातून तो त्या माणसाकडे पाहत होता. त्याच्या तोंडातली बिडी पेटलेली होती, तो झुरका घेत केदारच्या कारच्या साईडच्या आरशात बघत होता. दोघांची नजरानजर झाली तशी त्या माणसाने हाताचा फणा काढून साप दाखवला. केदारने लक्ष रस्त्यावर केंद्रित करत ऍक्सिलेटर मारला. गाडी थोडी पुढे जाईस्तोवर त्याला त्या माणसाच्या मोठ्यामोठ्याने हसण्याचा आवाज येत राहिला.

FM वर लागलेल्या किशोर स्पेशल गाण्यांमुळे जवळपास लगेचच केदारला त्या माणसाचा विसर पडला. तीन वाजले त्याला त्या जंगलात पोहोचायला. केदारने गळ्यात त्याचा कॅमेरा अडकवला आणि तो कारबाहेर पडला. तिथे नीरव शांतता होती. आजूबाजूला पाहत तो पुढे जाणार इतक्यात त्याच्या शॉर्ट्सच्या खिशातला फोन वाजला. केदार दचकला. “च्यायला, आज सतत कोणी ना कोणीतरी दचकवतंय. आधी तो साधू आणि आता फोन” म्हणत त्याने खिशातून फोन काढला. बायकोचा कॉल होता.
“हॅलो”
“हॅलो काय…कुठे आहेस? मी कधीची फोन करतेय…सारखा आऊट ऑफ रिच येतोय”
“होय राणी, फोनला रेंज नाहीये, बऱ्याच वेळापासून”
“तुला कसं वाटतंय आता? काम झालं का?”
“मी ठीक आहे. आताच पोहोचलो इथे…हॅलो हॅलो”

अचानक फोनची रेंज पुन्हा गेली. केदारने त्रासून फोन परत खिशात ठेवला. कॅमेरा सरसावून तो त्या पक्ष्याच्या शोधात निघाला. थोडं पुढे गेल्यावर त्याला खाली सळसळण्याचा आवाज आला. त्याने चमकून पाहिलं, त्याच्यापासून जेमतेम एका फुटावरून एक बारकासा साप वळवळत गेला. बत्तीस डिग्री तापमान होतं पण त्याला तो साप पाहून घाम फुटला. मनात पाल चुकचुकली. आज इथे यायला नको होतं असं वाटायला लागलं. त्याने मनगटावरल्या घड्याळात पाहिलं. साडेतीन वाजले होते. फक्त पंधरा मिनिटं त्या पक्ष्याला शोधायचं, नाही सापडला तरी परत फिरायचं, त्याने ठरवलं. सात आठ मिनिटं पुढे गेल्यावर त्याला एका झाडाच्या फांदीवर बसलेला तो पक्षी दिसला. तो मनोमन सुखावला. आता सपासप शॉट्स घ्यायचे आणि घरी सुसाट पळायचं. त्याने कॅमेरा सरसावला, शॉट्स घेतले. आणखीन एक मस्त शॉट मिळत होता. तो कॅमेऱ्यात वर फोकस करत पुढे सरसावला. तसा त्याचा पाय कश्यावरतरी पडला आणि त्याच्या पोटरीत त्याला दंश झाल्याची कळ आली. त्याने पाय झटकला. खाली पानात कसलातरी आवाज आला पण काय ते दिसलं नाही.

त्याच्या पोटरीवर दोन बारीक स्पॉट्स होते ज्यातून थोडं रक्त येताना दिसलं. त्याला दरदरून घाम फुटला. डोळ्यासमोर हाताचा फणा दाखवणारा साधू आला. जिवाच्या आकांताने तो पळतपळत गाडीच्या दिशेने निघाला. गाडीजवळ पोहोचण्याच्या आत तो जमिनीवर कोसळला. त्याला आलेलं प्रेशर त्याचं हृदय सहन करू शकलं नाही आणि सीव्हीयर हार्ट अटॅकने तो जागीच गेला.

जंगलात ज्या ठिकाणी तो फोटो काढायला उभा होता त्या जागेवर खाली एक काटेरी डहाळी पडलेली होती. तिच्यावरच्या दोन काट्यांच्या टोकावर थोडं रक्त लागलेलं होतं.

One thought on “शाप

Leave a comment