इनबॉक्स

तो चौतीस वर्षांचा असेल. अनमॅरिड. अजूनही सिंगल. एका आयटी कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत. कामात एकदम हुशार, नियमित प्रमोशन्स मिळवणारा. मुळचा पुण्याचा, प्रोजेक्टमुळे बंगलोरमध्ये स्थित. ऑफिसच्याच जवळ एका कॉम्प्लेक्समध्ये त्याने भाड्याने घर घेतलेलं होतं, येण्याजाण्याचा त्रास वाचावा म्हणून. घरातून पाच मिनिटं पायी ऑफिस. त्यामुळे संध्याकाळी काम संपवून तो लवकर घरी जायचा. वाचन, चित्रपट पाहणं आणि दोन्हींवर लिहिणं हा त्याचा छंद. लिहायचाही छान. फेसबुकवर ऍक्टिव्ह होता. ऍक्टिव्ह फेसबुक आणि उत्तम लिखाण एक डेडली कॉम्बिनेशन असतं. देशविदेशातली मंडळी त्याचे फेसबुक फ्रेंड्स आणि फॉलोवर. तीनेक हजार मित्र आणि सात हजार फॉलोवर्स एवढा गोतावळा. संध्याकाळी एखादी पोस्ट लिहिली की तिच्यावर येणाऱ्या कमेंट्सना उत्तरं देणे, गप्पा मारणे ह्यात त्याचा वेळ निघून जात असे. तो दिसायलाही रुबाबदार आणि प्रसन्न व्यक्तिमत्व. एकूण छान चाललेलं होतं.

ती ही होती त्याच्या मित्रयादीत. आठेक महिन्यांपूर्वी तिने रिक्वेस्ट पाठवली, ह्याने एक्सेप्ट केली. फेसबुकवर हळूहळू त्याचे काही मित्रमैत्रिणी तिचेही कॉमन फ्रेंड्स झाले. ती कधी पोस्ट लिहायची नाही. काही आवडलं तर शेयर मात्र करायची, लाईक करायची. क्वचित एखादी कमेंट. एके दिवशी तिने त्याच्या पोस्टखाली एक कमेंट केली. एकदम खुमासदार आणि मार्मिक. बऱ्याच लोकांना ती आवडली, भरपूर लाईक्स आल्या आणि फ्रेंड रिक्वेस्टही. जणू काही तिच्यासाठी एक बूस्ट मिळालं. तेव्हापासून ती थोडंफार स्वतः लिहायला लागली. त्याच्या पोस्टवर मात्र तिचा लाईक न चुकता येत असे. चाणाक्ष वाचक पोस्टबरोबर बरंच काही वाचत असतात. त्याची पोस्ट आणि तिचं लाईक, कमेंट हे समीकरणही त्यांच्या नजरेतून सुटलं नव्हतं. मग एके दिवशी त्याने तिला इनबॉक्स मध्ये मेसेज केला.

“हाय”

ती ऑनलाईन होती, तिने लगेच रिप्लाय केला “हाय”

“माझ्या पोस्टवर मागे तुम्ही एक कमेंट केली आणि त्यानंतर यु हॅव नॉट लूक्ड बॅक. तुमचं हे लिहितं व्हायचं क्रेडिट माझं बरं का 🙂 ”

“नक्कीच, मी स्वतःच हे तुम्हाला सांगणार होते. पण इनबॉक्स खूप बदनाम आहे, म्हणून कधी धाडस केलं नाही”

“हा हा हा. अहो, इनबॉक्स बदनाम नाहीये, तो लोकांनी केलाय. चांगल्या, निखळ गप्पांसाठी, कामकाजासाठीही वापरला जातो की. ते वापरणाऱ्यावर अवलंबून असतं”

“बरोबर आहे तुमचं. मला आता जरा काम आहे, मी निघते. कधी निवांत गप्पा मारू”

“ओके…बाय”

नंतर कधी एखाद दोनदा त्यांचं इनबॉक्स मध्ये जुजबी संभाषण झालं. अहोजाहो वरून एकेरीवर आले. दोनेक महिन्यानंतर तिने त्याला इनबॉक्स मध्ये पिंग केलं

“हाय”

“बोला मॅडम, काय म्हणताय”

“मी मजेत. तू कसा आहेस?”

“मी ही मजेत. बोल, काय खास?”

“मी ही बॅंगलोरमध्ये राहते. तू पुर्वांकरा कॉम्प्लेक्स मध्ये राहतोस ना?”

“होय. अरे वाह, तुला कसं माहिती?”

“तूच एकदा चेक इन केलं होतंस घरी असताना”

“अरे हो गं”

“मला भेटायचंय तुला, भेटूया का? मी तुझ्या आसपासच्या एरियातच राहते”

त्याने मेसेज वाचला आणि तो त्या प्रश्नावर थोडावेळ घुटमळला. तिला काय रिप्लाय द्यावा त्याला कळत नव्हतं. तिचा प्रश्न चुकीचा नसला तरीही अनपेक्षित होता. त्याने टाईप करायला घेतलं पण नक्की काय उत्तर द्यायचं हेच कळत नव्हतं. तो पाच मिनिटं टाईप, डिलीट करत राहिला आणि शेवटी त्याने इनबॉक्स वरून लॉग आऊट केलं”

तिला हे दिसत होतं. त्याने लॉग आउट केल्यावर तिनेही केलं. तासाभराने पुन्हा त्याने लॉगिन केलं. ती ऑफलाईन होती. त्याने तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

“सॉरी, मगाशी तुझा प्रश्न इतका अनपेक्षित होता की पटकन काय बोलायचं कळलं नाही. मी ओळख नसताना आजतागायत कोणाला भेटलेलो नाही म्हणून जरा अवघडलो. कोरमंगला एरियात एक छान रेस्टोरंट आहे, पंजाब ग्रिल नावाचं. शनिवारी तिथे लंचला भेटूया का?”

दुसरा दिवस उजाडला. त्याने लिहिलेला रिप्लाय तिने वाचलाय हे त्याच्या लक्षात आलं पण तिचं उत्तर नव्हतं. तीन-चार दिवस गेले. त्याचं फेसबुकवरचं लिखाण जोमाने सुरु होतं. पण ना तिचा मेसेज आला ना लाईक. एक आठवड्यानंतर त्यांच्या एका कॉमन फ्रेंडने त्याला व्हॉट्सअपवर विचारलं “तिचा लाईक, कमेंट नसतो आजकाल तुझ्या पोस्टवर. काय बिनसलं की काय तुमचं?”

“नाही रे. मला तर ती दिसत नाहीये माझ्या मित्रयादीत. डीएक्टिवेट केलेलं दिसतंय तिने अकाउंट”

“अरे, माझ्या मित्रयादीत तर आहे ती. तिने तुला ब्लॉकलं म्हणजे”

“ओह! माहित नाही का ते”

पुढल्या दोन-तीन दिवसांत आणखीन दोन-तीन कॉमन फ्रेंड्सकडून विचारणा झाली. शेवटी त्याने फेसबुकवर पोस्ट लिहिली.

“बऱ्याच जणांनी विचारलं म्हणून इथेच शेयर करावसं वाटलं. ना मी काही वावगं बोललो होतो ना तिने काही वावगं विचारलं होतं, पण माहित नाही का तिने मला ब्लॉक केलं” आणि त्याने त्यांच्या चॅटचे स्क्रिनशॉट शेयर केले. नेहमीप्रमाणे कमेंट्स मध्ये हळहळ व्यक्त केली गेली. स्क्रिनशॉट शेयर करायला नको होता हे जनरल मत पडलं पण त्याला काउंटर असंही आलं की “नाहीतर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला नसता आणि बाई असल्यामुळे तिला झुकतं माप मिळालं असतं”. काहीजणांनी तिच्या “मला भेटायचंय तुला, भेटूया का? मी तुझ्या आसपासच्या एरियातच राहते” वाक्याचं उघड पोस्टमॉर्टेमही केलं “तिला तुझ्या घरी भेटायचं होतं, तू बाहेर भेटायला बोलावलं. आवडलं नसणार”. काहीजणांनी तिच्यावर शेलकी भाषेत टीका केली. त्याने त्यांना आपली भाषा सुधारायला सांगितलं. सरतेशेवटी “मी हा थ्रेड बंद करतोय” म्हणत पोस्टची सांगता केली.

दुसऱ्या दिवशी, सकाळी त्याने लॅपटॉप उघडला, फेसबुकवर लॉगिन केलं. त्याचा इनबॉक्स दुथडी भरून वाहत होता. अनेक मैत्रिणींचे मेसेजेस होते. “एलिजिबल बॅचलर्स फार कमी असतात रे आजकाल, ते ही तुझ्यासारखे जंटलमन, तू जास्त विचार करू नकोस” असा एकंदर सूर होता. लहानपणापासून त्याला एक कॉम्प्लेक्स होता. मुलींशी बोलता यायचं नाही, अजूनपर्यंत आलेलं नव्हतं. आपण त्यांना हवंहवंसं वाटायला हवं असं मनापासून वाटायचं पण बोलताना दरदरून घाम यायचा. आताही त्याच्या हाताला कंप सुटला होता. तो मांडीवर पुसत तो हसला. त्याने त्याचं आयपॅड उघडलं. त्यावर फेसबुक उघडलं. युजरनेम मध्ये तिचं नाव टाकलं, पासवर्ड टाकला. तिथेही इनबॉक्स मध्ये काही मेसेजेस होते, तिला दूषणं देणारे. तो पुन्हा हसला. सेटिंग्स मध्ये जाऊन त्याने स्वतःच्या आयडीला अनब्लॉक केलं आणि इनबॉक्स मध्ये जाऊन स्वतःच्या मेसेजला रिप्लाय करायला घेतला “अरे सॉरी…”

5 thoughts on “इनबॉक्स

Leave a comment